काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. अमोल कोल्हे यांनी केलेल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत म्हणाले, अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याची दयनीय अवस्था आहे. त्यांना ठाकरे गटावर टीका करण्याचा अधिकार काय? त्यांनी आत्मचिंतन करावं, असा खोचक सल्लाही विनायक राऊत यांनी दिला. तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या पक्षाच्या स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे, असं अंबादास दानवे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ‘आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. आता आपल्याला लढायला संधी आहे. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे..’, असं अमोल कोल्हे म्हणाले. तर दुसरीकडे जागावाटपाच्या घोळामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. इतकंच नाहीतर नाना पटोले आणि संजय राऊत यांचं थेट नाव घेत विजय वडेट्टीवार यांनी आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे.